सुस्वागतम...माझ्या या शैक्षणिक ब्लॉगवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे......... WEL-COME ON MY BLOG .......

Saturday 10 June 2023

आनंददायी शिक्षणासाठी प्रयोगशिलता जोपासावी.

आनंददायी शिक्षणासाठी प्रयोगशिलता जोपासावी.*

 

         पहिल्या शैक्षणिक सत्रातील सुरुवातीचे दिवस होते. त्यावेळी मी 'दुसरे पाऊल आनंदी शिक्षणाची चाहूल' हा कृतिशील नवोपक्रम वर्गामध्ये राबवण्यास सुरवात केली होती. इयत्ता दुसरीच्या वर्गातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी रोज वेगवेगळे प्रयोग, अध्ययन अनुभव व कृती उपक्रम यांचा विचार करुन त्याची अनुभूती दिली जायची. मुलांना शिकण्याची व मला शिकवण्याची इतकी गोडी वाटायची की, घड्याळयात ५ ला मागे टाकून तास काटा केव्हा पुढे सरकायचा हे समजायचेही नाही. मग अशावेळी  *"मुलांनो, शाळा सुटली...चला आता घरी."* हे माझे शब्द ऐकताच समुद्राला भरतीची लाट यावी तसा मुलांच्या उत्साह या शेवटच्या क्षणीही उच्च कोटीला जायचा. अर्थात तो दिवसभर टिकवला गेला होता म्हणूनच तर त्यामध्ये उच्चतम पातळी गाठण्याची क्षमता होती. यानंतर मुलांची एक वेगळीच लगबग,अवाराअवर, गडबड गोंधळ सुरु व्ह्यायचा. या वयात शाळा सुटताच घराच्या दिशेने वायू वेगाने जाण्याची बालचमुंना सवय असते. मग काय ! खांद्याला दप्तर कसेबसे अडकून छोट्याश्या दरवाज्याच्या चौकटीतून बाहेर पडण्याची चढ़ाओढ़ साऱ्यांनाच नेहमीप्रमाणे लागलेली असायची. असे असले तरी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह आणि ऊर्जा सकाळी शाळेत येण्याच्या वेळेपेक्षा काही अधिकच चमकत असायची. मुले त्याच वेगात आपल्या पायात चप्पल अडकवत आणि एकमेकांना ढकलाढकली करत हातात हात घालूत रमत गमत शाळेच्या बाहेर पडायची. याच वेळी मग काही मुलांच्या तोंडून आपसूकच एक ठरलेलं वाक्य यायचं, *" आज शाळेत खूप मज्जा आली रे !"* हे वाक्य ऐकल्यानंतर मला का कुणास ठाऊक एक वेगळे आत्मिक  समाधान वाटायचे. जणू काही तो दिवस खऱ्या अर्थाने मला सार्थकी झाल्याचा आनंद वाटायचा. यानंतरही नियमितपणे हेच वाक्य मुले रोज शाळा सुटल्यावर घरची वाट धरल्यावर उत्फुर्तपणे म्हणायची ! त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि तेज अवर्णनीय दिसायचे, शिवाय माझे कानही रोज या समयी हे वाक्य ऐकण्यासाठी असुरलेले असायचे. जणू काही ते माझे दिवसभराच्या कामकाजाचे प्रशस्तीपत्रक मिळाल्यासरखे वाटायचे. यातून एक नवी गोष्ट मला समजली, *'शिकण्यात आनंद वाटणं, हे आपल्या शिक्षणाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे'.*  हे ध्येय साध्य करण्यासाठीचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे 'शिक्षणातील प्रयोगशीलता'

             घोकंमपट्टी करुन विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान अगर माहिती ही अल्पकाळ ध्यानात राहते. प्रत्यक्ष अनुभवातून अगर प्रात्यक्षिकातून निरीक्षणद्वारे अवगत झालेले ज्ञान दीर्घकाळ टिकणारे असते. एडगर डल चा शंकू देखील प्रत्यक्ष अनुभव, प्रात्यक्षिके, नाट्यीकरण, सहल, दृश्य प्रतिके यांनाच अधिक महत्व देतो. शिक्षा करुन एखाद्या घटकावरील प्रश्न तोंडपाठ करुन घेतली, चाचणीत मुलांना खूप सारे मार्क पडले, आपल्या दैनिक टाचण वहीतील नियोजनप्रमाणे कामकाज पूर्ण झाले, म्हणजे आपले दिवसाचे उद्दिष्ट पूर्ण झाले असे म्हणायचे का ? नक्कीच नाही ! प्रथमतः मुलांना शाळेत येण्यात आवड असली पाहिजे. शिकण्यातील आनंद लुटण्याची क्षमता व अभिरुची अंगभूत झाली पाहिजे. प्राप्त ज्ञानाचे उपयोजन व्यावहारिक जीवनात करण्याची कुवत मुलांच्यात निर्माण झाली असेल तर खऱ्या अर्थाने आपण योग्य दिशेने आपली उद्धिष्टे व ध्येये प्राप्त केली असे म्हणता येईल.

                काळपरत्वे शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे देखील आपली महत्वाची जबाबदारी आहे. कारण समाजाचे प्रतिबिंब शिक्षणात व शिक्षणाचे प्रतिबिंब समाजात उमटत असते. या दोन परस्परावलंबी गोष्टीचा समन्वय साधण्याचे कसब आपण अंगीकृत केले पाहिजे. 21 व्या शतकाला सामोरे जाताना विद्यार्थीप्रती अपेक्षित क्षमता, कौशल्य प्राप्तीचा विचार नवीन राष्ट्रीय धोरणातही केला आहे. या सर्व आव्हानांचा विचार करता आपली भूमिका किती सशक्त असायला पाहिजे, याचा विचार करणे भाग पडते. 'बदल' हे चैतन्य निर्मितीचे कारण असते, म्हणून आपण बदल स्वीकारत असताना आपल्या भूमिकेत आवश्यक बदल स्वीकारला पाहिजे. आजुबाजूला प्रत्येकजण या जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी स्वतःच्या कार्यक्षेत्रातील बदल, नाविन्यता व प्रयोग स्वीकारत आहेत; म्हणून आपण सुद्धा आपल्या शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे बदल आणि त्यासाठी विविध प्रयत्न व प्रयोग स्वीकारायला हवेत. आपल्या शालेय जीवनात आपण ज्या पद्धतीने शिकलो होतो त्याच पद्धतीने आजही आपण आपल्या विद्यार्थ्यांना जर शिकवत असाल, तोच कित्ता गिरवत असाल तर नक्कीच आपली शिक्षण पद्धती गतिमान व काळानुरुप आहे असे म्हणता येणार नाही.

           पूर्वी 'प्रयोग' हा शब्दप्रयोग विज्ञान सारख्या शास्त्र विषयासंदर्भात अधिक प्रमाणात केला जाई पण आज मराठी, गणित, इंग्रजी, इतिहास याविषया सोबत कला, कार्यानुभव सारख्या विषयातही प्रयोग करण्याची वृत्ती वाढत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. ज्ञानरचनावादावर आधारित 'कुमठे बीट' मध्ये केलेले शिक्षण प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक ठरले. असेच विविध विषयासाठी नविन्यपूर्ण प्रयोग प्रत्येकाने आपपल्या स्तरावर करायला हवेत. शिवाय आपल्या स्तरावर यशस्वी झालेले प्रयोग इतरांच्या पर्यत कसे पोहचतील ? यासाठीही प्रयत्नशील असायला हवे. माझ्या नवोपक्रम अंतर्गत मराठी सारख्या विषयातील वाचन-लेखन सारख्या मुलभूत आणि पायाभूत क्षमतांचा विकास करण्यासाठी मी सहज सुलभ छोटे छोटे प्रयोग कसे करता येईल ? याचा सातत्याने विचार करत असायचो. यात टाकाऊ वस्तूचा वापर कसा प्रभावी करता येईल ? यालाही प्राधान्य दिले. विविध प्रकारच्या कागदी तुकड्या पासून मॅजिक कार्ड बनवणे, सुकलेली झाडांना शब्द पर्ण जोडून ज्ञानाची रोपटे बनवणे, भाषण-संभाषण व निवेदन कौशल्य विकास यासाठी आम्ही छोटे वार्ताहर हा उपक्रम सुरु करुन शाळेची नवी वृत्तवाहिनी सुरु करणे असे विभिन्न १७ प्रयोग यशस्वी ठरलेत शिवाय अध्ययन प्रणाली आनंददायी करण्यास पूरक ठरले. गणित विषयातील महत्वपूर्ण संकल्पना खेळाच्या माध्यमातून शिकवल्या तर मुले आवडीने शिकतात व त्यांचे दृढ़ीकरण देखील चांगले होते हे अनुभवावरुन लक्षात येत होते. मणी, माळा, पाने, खडे, बिया, काड्या यासारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू गणितीय क्रिया समजावून देताना चित्रात न दाखवता प्रत्यक्ष हाताळण्यास दिल्यास किती सुलभ ठरते हे अनुभवावरुन लक्षात आले.

              प्रभावी शिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाने आपल्या अंगी  'प्रयोगशीलता' जोपासणे गरजेच आहे. विविध विषयातील प्रत्येक घटक नविन्यतेने, कल्पकतेने किंवा प्रयोगशीलतेने कसा अधिक सुलभ प्रकारे विद्यार्थ्यांना समजावून देता येईल ? याचा शिक्षकाने निरंतरपणे विचार केला पाहिजे. शिक्षकांच्या कार्यपद्धतीवरून आपण त्यांचा दर्जा ठरवत असतो. ज्यांच्या कामात नेहमीच कंटाळा वा बेजबाबदार दिसतो अगर ज्याच्याजवळ नेहमी नकारात्मक कारणे मिळतात, असे शिक्षक 'निष्क्रिय शिक्षक' मानले जातात. काही शिक्षक खूप तयारी करतात, स्वतःच खूप बडबड करतात, अगदी जीव ओतून शिकवत राहतात पण ही अध्यापन प्रणाली अधिकतर एकेरी राहते, यात विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी किंवा आंतरक्रिया फार अत्यल्प ठरल्याने अशावेळी या शिक्षकांना एक 'सामान्य शिक्षक' असे संबोधले जाते. काही शिक्षक आपले अध्यापन प्रभावी करण्यासाठी शैक्षणिक साधन निर्मितीचा विचार करतात त्यांचा वापर करतात, विविध माध्यमे वापरुन आपले अध्यापन रंजक कसे होईल ? यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या शिक्षकांना 'चांगला शिक्षक' म्हणून ओळख मिळते. यापुढे जाऊन काही शिक्षक आपल्या वर्गामध्ये विद्यार्थी शिकतील किंवा शिकण्यास प्रवृत्त होतील असे अनुकूल वातावरण तयार करतात. ज्या वातावरणात मुलांची ग्रहण व अध्ययन क्षमता वाढीस लागते. खऱ्या अर्थाने असे अनुकुल शैक्षणिक वातावरण तयार करणारे शिक्षक सर्वाच्यासाठी 'आदर्श शिक्षक' ठरतात. आता राहिला प्रश्न म्हणजे... या सर्वांमध्ये आता अतीउत्कृष्ट शिक्षक कोणाला म्हणायचं किंवा शिक्षकाची सर्वात आदर्श भूमिका कोणती असावी ? 'अतिउत्कृष्ट शिक्षक' हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतो. म्हणून आपणास जर अतिउत्कृष्ठ शिक्षक व्हायचं असेल तर विद्यार्थ्यांचं आपण प्रेरणास्त्रोत व्हायला पाहिजे. आपल्या भूमिकेतून व आपल्या कृतीतून एक उत्कृष्ट अध्ययनार्थी घडवण्यासाठी त्यांची अंतरिक प्रेरणा जागृती होईल अशी भूमिका आपली राहिली पाहिजे.

         आपल्या शैक्षणिक प्रयोगातून आंतरक्रिया ही बाब कशी साध्य होईल ? याच्यावर भर दिला पाहिजे. ही आंतरक्रिया शिक्षक-विद्यार्थी इतकीच मर्यादित न राहता कधी विद्यार्थी-विद्यार्थी अशीही घडली पाहिजे. किंबहुना शिक्षक-विद्यार्थी-पालक हा त्रिकोण साध्य करणारी आंतरक्रिया निर्माण होणे या पेक्षाही प्रभावी ठरते. कधी कधी मुलांचा असाही अनुभव येतो की, शिक्षकांनी समजावून दिल्यापेक्षा त्यांना त्यांच्याच विद्यार्थी मित्रांनी समजावून दिलेले अगदी  सहजपणे समजत असते अर्थात गळी उतरत असते. यासाठीच Peer Learning चे महत्त्व अधोरेखित होईल असे कृतीपर प्रयोग राबवणे गरजेचे वाटते. बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट "मुलांनो, तुम्हाला हे नीट समजलं का ?" असं ज्यावेळी आपण विचारतो, त्यावेळेला बऱ्याचदा मुलं भीती पोटी अगर दडपण घेऊन न समजलेलं सुद्धा स्पष्टपणे वर्गामध्ये सांगण्यासाठी कचरत असतात. एखाद्या वेळी अवघड वाटलेला घटक आपण समजावून सांगताना मुले गोंधळून गेलेली दिसतात. मग अशावेळी तोच घटक नीट समजलेल्या वर्गातील एखाद्या प्रज्ञावान विद्यार्थी मित्राच्या सह्ययाने त्याला समजावून दिल्यास तो पटकन लक्षात येतो, हे अनुभवातून लक्षात येते. म्हणतात ना ! 'पाखरांची भाषा जशी पाखरांना पटकन समजते !' तशीच 'बालकांची भाषा बालकांना पटकन समजते की काय ?' असा विचार मनात येऊन जातो. अध्ययन अनुभूती बरोबर इतर गोष्टीतही वेगळेपणाचा विचार आपण करु शकतो. 'प्रबलन' ही शिक्षणाची सर्वात मोठी ऊर्जा आहे. ही कशी अधिक वृद्धिगंत करता येईल ? याचा विचार करणे सुद्धा खूप गरजेचे आहे. आत्मविश्वासातून आणि प्रेरणेतूनच मुलांची शिकण्याची भूक वाढत असते. म्हणून असे 'प्रबलन' देण्यासाठी वेगळी कोणती नवीन पद्धती राबवता येईल ? या विचारातून मी काही वर्गातील विद्यार्थ्यांच्यासाठी 'शाब्बासकीचे शिक्के' तयार करुन घेतले आणि मग स्वाध्याय किंवा गृहपाठ तपासल्यानंतर हे शिक्के वहीवर मारण्यास सुरुवात केली. ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्टार देणे, खूप छान, अतिशय सुंदर,Very Good, Very Nice अशा रिमार्कचे वेगवेगळे शिक्के तयार करून घेतले. असे शिक्के आपल्या वहीवर रोज मिळावेत यासाठी मुले नियमित अभ्यास करायला लागलीत, शिवाय चांगला आणि पूर्ण अभ्यास करण्याची सवय सर्वांना लागली. मुलांचे भाषण, निवेदन कौशल्य, आणि सामान्य ज्ञान सुधारण्यासाठी आम्ही शाळेमध्ये 'व्हर्च्युअल न्यूजरूम स्टुडिओ' सुरू केला ज्यामधून मुले परिसरातील आणि चालू घडामोडी वर आधारित बातम्यांची निवेदन करू लागले शिवाय त्याचा व्हिडिओ सुद्धा प्रसारित करण्यात आले. यातून मुलांच्या मध्ये बोलण्यातील एक वेगळाच आत्मविश्वास सुद्धा निर्माण झाला.

              अध्यापन हे एक 'शास्त्र' आहे यापेक्षाही अध्यापन ही एक 'कला' आहे या दृष्टिकोनातून कार्य केल्यास यातील परिणामकारकता अधिक सकारात्मक दिसून येईल. भविष्यात चरितार्थ चालवण्यासाठी सक्षम करणारे शिक्षण देण्यापेक्षा जिवनाभिमुख व जीवनकौशल्याधिष्ठित शिक्षण देणे महत्वाचे आहे. एक उत्तम परीक्षार्थी बनण्यापेक्षाही एक उत्तम माणूस.. एक सुजाण नागरिक कसा घडवता येईल ? याचाही व्यापक विचार केला पाहिजे. मुले शिक्षण्यातील आनंद तेव्हाच घेऊ शकतील जेव्हा आपली शिकवण्यातील आनंदाची स्वानुभूति जागृत होईल. विद्यार्थी नवविचार अगर प्रयोगशील तेव्हाच बनतील जेव्हा आपण शिक्षक या भूमिकेत प्रयोगशील बनाल !

 

✍️ श्री. सचिन देसाई

 

Friday 2 June 2023

'शिष्यवृत्तीच्या आखाड्यातील वस्ताद गुरुजन'| शिष्यवृत्ती निकाल इनस्पीरेशन...

लिट्ल न्यूज रिपोर्टर | 'दूसरे पाऊल आनंदी शिक्षणाची चाहूल' नवोपक्रम- फाउं...

शॉर्ट कार्ड्सचा वापर | शब्द वाचन सराव, संख्याज्ञान दृढ़ीकरण उपक्रम | दूसर...

माझे ज्ञानाचे रोपटे | दूसरे पाऊल आनंदी शिक्षणाची चाहूल नवोपक्रम | शब्दसं...

अशी घेतली EVM द्वारे शालेय मंत्रीमंडळ निवडणूक| लोकशहीचा पहिला धडा प्रत्य...

Touch With Global World | Inovative Program for ICT Integration |V.M.Bas...

ICT CENTER V.M.BASHACHAMOLA | Use Of Smart Board With Sound System | प्र...

हम सब एक है | We Are One | राष्ट्रीय एकात्मता |Promotion Of Nation Build...

Saturday 23 July 2022